मुंबई प्रतिनिधी
रेल्वे अपघातात हात गमावलेली मोनिका मोरे (वय 29) या तरुणीचे हाताचे प्रत्यारोपण होऊन नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ताडदेव येथील ताडदेवच्या राजाने अवयवदानाबाबत जनजागृती रॅली चे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये मोनिका मोरेने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सहभाग नोंदवला.
दोन्ही हातांचे प्रत्यारोपण करणारी राज्यातील ही पहिलीच घटना असून, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने मोनिकाच्या हातात बळकटी निर्माण झाली आहे. हात नसताना कायम प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून असणारी मोनिका मिळालेल्या नवीन हातांमुळे बहुतांश गोष्टी स्वतःच करते.
३२ वर्षीय एका मेंदूमृत व्यक्तीकडून हे हात मिळाले. याकरिता ते चेन्नईहून मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली, त्याकरिता १५ तासांचा अवधी लागला होता.
मोनिकावर शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले, “सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने तिचा हाताचा वापर होत आहे, तो अतिशय चांगला आहे. विशेष म्हणजे तिचा जो रंग आहे, तोच रंग तिच्या हातालाही प्राप्त झाला आहे. यावेळी तिच्या प्रत्यारोपण केलेल्या हाताचे हस्ते या मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी तिच्यावर हाताचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉ निलेश सातभाई उपस्थित होते. त्यांनी आतापर्यंत 13 रुग्णांवर हाताचे प्रत्यारोपण केले आहे. अजूनही तीन ते चार रुग्ण हात मिळावेत म्हणून प्रतीक्षायादीवर आहेत.
ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोउत्सव मित्र मंडळाचे विशेष आभार. त्यांनी अवयवदानासारख्या सवेंदनशील विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिमेचे आयोजन केले. मंडळाचे विश्वस्त अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी ही रॅली यशस्वी व्हावी म्हणून विशेष प्रयत्न केले.








