मुंबई प्रतिनिधी
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनधिकृत व अनियंत्रित पद्धतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम टर्फ (Artificial Turf) आणि बॉक्स क्रिकेटच्या मैदानांना शिस्त लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीने “अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ पॉलिसी” (Advanced Smart Turf Policy) लागू करावी, या संदर्भातील ठरावाची सूचना महापालिकेत सर्वानुमते मंजूर करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी मांडलेल्या या ठरावाला मंजुरी मिळाल्याने आता महापालिका प्रशासनाला यावर तातडीने कृती अहवाल (Action Taken Report) सादर करावा लागणार आहे.
*१,५०० हून अधिक टर्फला होणार मदत*
मुंबईत मोकळ्या मैदानांची कमतरता असल्याने गेल्या काही वर्षांत १,५०० हून अधिक टर्फ सुरू झाले आहेत. मात्र स्पष्ट नियमावली नसल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा आणि शांततेचा प्रश्न निर्माण झाला होता. हा ठराव मंजूर झाल्यामुळे टर्फ खेळाला मदत होणार आहे.
खेलो मुंबई’ ॲपद्वारेच बुकिंग: सर्व टर्फची नोंदणी, ऑनलाइन आरक्षण, परवानग्या आणि महसूल व्यवस्थापन महापालिकेच्या ‘खेलो मुंबई’ ॲपद्वारेच बंधनकारक केले जाईल. यामुळे रोख व्यवहार बंद होऊन पूर्ण पारदर्शकता येईल.
विषारी रबर कणांवर (Toxic Rubber Crumbs) बंदी: खेळाडूंच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या व कर्करोगास कारणीभूत ठरू शकणाऱ्या निकृष्ट रबर कणांवर बंदी घालून केवळ पर्यावरणपूरक साहित्याचा वापर सक्तीचा केला जाईल.
छत जाळी (Roof Net) अनिवार्य: सुरक्षेच्या दृष्टीने आणि निवासी भागातील उपद्रव टाळण्यासाठी सर्व टर्फवर संरक्षणात्मक छत जाळी बसवणे बंधनकारक असणार आहे.
नियमित तपासणी व कडक नियम: ध्वनीप्रदूषण, फ्लडलाइट्सचा त्रास, वाहतूक कोंडी, अग्निसुरक्षा आणि पर्यावरण नियमांचे पालन केले जाईल4
नागरिकांचे आरोग्य आणि खेळाडूंची सोय यांचा समतोल
रात्री उशिरापर्यंत चालणारा गोंधळ आणि प्रखर फ्लडलाइट्समुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी हे धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. टर्फवर पूर्ण बंदी न घालता, खेळाडूंची सोय आणि स्थानिक रहिवाशांची शांतता या दोघांचा सुवर्णमध्य साधणारा हा ठराव मानला जात आहे.
“मुंबईला क्रीडाप्रेमी शहर बनवताना नागरिकांच्या स्वास्थ्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. आमचा उद्देश टर्फ बंद करण्याचा नसून त्यांना आधुनिक व कायदेशीर चौकटीत आणण्याचा आहे. ठराव मंजूर झाल्यामुळे आता महापालिका आयुक्तांनी यावर तातडीने अंमलबजावणी अहवाल सादर करावा, ही आमची मागणी आहे.”
तेजिंदर सिंग तिवाना (नगरसेवक व स्थायी समिती सदस्य, भाजप)
महापालिकेत हा ठराव मंजूर झाल्यामुळे आता प्रशासनाकडून धोरण बनवून अंमलबजावणी कधी आणि कशी केली जाते, याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
Home ब्रेकिंग बातम्या भाजप नगरसेवक ताजिंदरसिंग तिवाना यांच्या सूचनेला यश; ‘खेलो मुंबई’ ॲपद्वारेच होणार बुकिंग...








