Home ब्रेकिंग बातम्या मुंबई हादरली! घरात घुसून अब्रूवर हात अन् जीवे मारण्याची धमकी; नराधम अद्याप...

मुंबई हादरली! घरात घुसून अब्रूवर हात अन् जीवे मारण्याची धमकी; नराधम अद्याप फरारच

0


मुंबई प्रतिनिधी:

ज्या हातांनी कष्ट करून आयुष्यभर घराचा गाडा ओढला, त्याच हातांना आणि अब्रूला भरदिवसा काळिमा फासण्याचा संतापजनक प्रयत्न दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरात घडला आहे. एका ५५ वर्षीय कष्टकरी महिलेच्या कामाच्या ठिकाणी घुसून, तिचे केस उपटून आणि शरीराचे लचके तोडण्यापर्यंत मजल गेलेल्या या घटनेने मुंबई हादरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भरवस्तीत एका माऊलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देणारा नराधम संजय गुरव हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गुन्हा दाखल होऊनही हा नराधम मोकाट असल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पीडित महिला गेली अनेक वर्षे कष्टाने आपलं पोट भरत असताना आरोपी संजय गुरव याने तिच्यावर पाळत ठेवून तिचा छळ सुरू केला होता. बुधवारी सकाळी ही महिला कामावर जात असताना, आरोपी तिचे चोरून फोटो काढत होता. जेव्हा त्या माऊलीने हिंमत करून जाब विचारला, तेव्हापासून या सैतानाच्या डोक्यात सूडाची आग भडकली होती. दुपारी दोनच्या सुमारास, जेव्हा ही महिला बोरा बाजारमधील ‘आश्रा’ बिल्डिंगमध्ये शांतपणे आपले काम करत होती, तेव्हा आरोपी संजय गुरव तिथे एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखा शिरला. त्याने केवळ अश्लील शिवीगाळच केली नाही, तर सर्व मर्यादा ओलांडून पीडितेचे केस पकडून तिला ओढले. भरलेल्या डोळ्यांनी ती महिला मदतीसाठी याचना करत असताना, या नराधमाने तिच्या पाठीत लाथ मारली आणि तिचा विनयभंग केला. “तुला जिवंत सोडणार नाही,” अशा गर्जना करत त्याने त्या महिलेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आणि तिथून पळ काढला.

सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका महिलेने मध्यस्थी केली म्हणून पीडितेचे प्राण वाचले, अन्यथा या विकृत मानसिकतेच्या माणसाने कोणते टोक गाठले असते, याचा विचार करूनही अंगावर काटा येतो. धडधडत्या छातीने या महिलेने रात्री पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. एम.आर.ए. मार्ग पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ (विनयभंग), ३५१ (जीवे मारण्याची धमकी) आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा तर दाखल केला आहे, मात्र आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एक हतबल महिला न्यायासाठी टाहो फोडत असताना, तिला मारहाण करणारा आणि तिची अब्रू वेशीवर टांगणारा गुंड अद्याप मोकाट फिरतोय, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आता पोलीस या फरार नराधमाला कधी बेड्या ठोकणार आणि पीडितेला न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here