मुंबई दि. (प्रतिनिधी) : समाजातील बदलत्या परिस्थितीत केवळ टीका करून उपयोग नाही, तर सक्रिय सहभागातूनच परिवर्तन घडवावे लागेल आणि यासाठी राष्ट्र सेवा दलासारख्या संघटनांनी सक्रिय होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सिने दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केले.
राष्ट्र सेवा दलाच्यावतीने पुणे येथे आयोजित क्रियाशील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. संपादक संजय आवटे, माजी विश्वस्त प्रकाश परांजपे, झेलम परांजपे, माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, महाराष्ट्राचे माजी कार्याध्यक्ष राजा अवसक हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी युवराज मोहिते हे होते. गेल्या काही वर्षांत न्यायव्यवस्था, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्राने आपली जबाबदारी पुरेशी पार पाडलेली नाही, अशी खंत व्यक्त करत गोस्वामी यांनी सांगितले की, अनेक कलाकारांच्या मनात ही अस्वस्थता असूनही ते मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे समाजात एक प्रकारची भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंधश्रद्धा आणि चुकीच्या माहिती विरोधात सातत्याने जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी कार्यकर्त्यांनी केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता ठोस कार्यक्रम राबवावेत, असे आवाहन केले. “प्रत्येक कार्यकर्त्याकडे क्षमता असते, मात्र त्यांना योग्य दिशा आणि नियोजनाची आवश्यकता असते,” असे ते म्हणाले.
विविध विचारांच्या लोकांशी संवाद साधत त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी सामाजिक माध्यमांच्या प्रभावावरही भाष्य केले. “आजच्या काळात सांस्कृतिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच प्रभावीपणे विचार पोहोचवता येतो,” असे त्यांनी नमूद केले.
नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे मालक नसून विश्वस्त आहेत, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारणे ही लोकशाहीची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकारच्या कार्यक्रमांमधून व्यापक सामाजिक चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तर संपादक संजय आवटे म्हणाले की, राष्ट्र सेवा दल ही आजच्या काळाच्या गरज आहे. नव्या पिढीला बोलत करायला हवं. भारताची कल्पना पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरु असताना आपल्याला भारत काय आहे हे सतत सांगायला हवं. जगात की क्रांती होते ती तरुणांकडूनच होते. आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करायला हवं.
या मेळाव्याच्या उदघाटन सत्राचे प्रास्ताविक राजा अवसक यांनी केले. तर सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केलं.अश्विनी सातव डोके यांनी आभार मानले. दीपाली आपटे, संजय गायकवाड, दत्ता पाकिरे, संदेश दिवेकर, प्रकाश डोंबाळे, प्रकाश कदम, तुकाराम अडसूळ आदी कार्यकर्त्यांनी मेळाव्याचे आयोजन केले.








