Home ब्रेकिंग बातम्या १९७५ ची आणीबाणी संविधानातील कलमानुसारच

१९७५ ची आणीबाणी संविधानातील कलमानुसारच

0


मुंबई प्रतिनिधी
इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली तत्कालीन परिस्थितीमुळे आणीबाणीचा निर्णय घेतला होता. या आणीबाणीचे समर्थन विनोबा भावे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही समर्थन केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिराजी गांधी यांना त्यावेळी दोन पत्रे लिहिले होती, त्यात घालीन लोटांगण…हाच प्रकार आहे. ती पत्रे का लिहिली होती, हेही तपासले पाहिजे, असे म्हणत आणीबाणीत काही प्रशासकीय चुक्या झाल्या पण काही इष्टही झाले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

फ्रेंड्स ॲाफ डेमोक्रसी आयोजित फॅसिस्ट हुकुमशाही विरोधी कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खा. संजय राऊत, माजी खा. कुमार केतकर, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, श्वेता संजीव भट आदी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, इंदिराजी गांधी यांनी १९७५ साली संविधानातील कलमानुसार आणीबाणीचा निर्णय घेतला होता आणि नंतर त्यांनी ती उठवली आणि मतचोरी न करता निवडणुका घेतल्या. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आणीबाणी ही चूक झाली हेही त्यांनी मान्य करत माफी मागितली आणि १९८० मध्ये देशातील जनतेने त्यांना पुन्हा बहुमताने विजयी केले. सोनियाजी, राहुलजी गांधी यांनीही नंतर आणीबाणीच्या काळात प्रशासनाच्या हातून काही चुका झाल्याचे मान्य केले आहे. आणीबाणी हा वेगळा अध्याय आहे. १९७१ च्या युद्धात लष्काराला तेल देणार नाही अशी भूमिका तेल कंपन्यांनी घेतली होती, त्यामुळे नंतर या तेल कंपन्या व काही बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 

आणीबाणीने देशाला शिस्त लागली हे मात्र कोणी बोलत नाही. काळाबाजार, भ्रष्ट्राचार करण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती. आज मात्र याच्या नेमके उलट होत आहे. आज भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. भाजपाच्या हुकूमशाहीत ३००० कोटींचे जास्तीचे टेंडर खास उद्योगपतीला दिले होते ते सुप्रीम कोर्टाने रद्द केले. धारावी अदानीला विकली, विमानतळ दिले. मराठीवर अतिक्रण करण्याचे काम याच हुकूमशाहीने होत आहे. संस्कृती व सभ्यतेवर घाला घातला जात आहे तोही याच हुकूमशाहीने असेही सपकाळ म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यपत्र शिदोरी मासिकाचा आणीबाणीवरील विशेषांकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here