Home ब्रेकिंग बातम्या सांस्कृतिक कार्य मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालेल्या गोरेगाव चित्रनगरीतील स्टुडिओना अल्पावधीत गळती !

सांस्कृतिक कार्य मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन झालेल्या गोरेगाव चित्रनगरीतील स्टुडिओना अल्पावधीत गळती !

0




मुंबई दि. १७ ( प्रतिनिधी ) :

मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओना भर पावसात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे  स्टुडिओच्या मालमतेचे नुकसान झाले आहे. स्टुडिओच्या बांधकाम आणि नूतनीकरण कामात गैरकारभार झाल्याच्या आरोप करीत या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रॅटीक ) चे मुंबई प्रदेश सरचिटणीस विशाल नावकर यांनी केली आहे. येत्या २ जुलै रोजी चित्रनगरीवर मोर्चाही काढण्यात येईल, असा इशारा नावकर यांनी दिला आहे.

गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरीत स्टुडिओ क्रमांक ८,९,१०,११ आणि १२ या स्टुडिओच्या देखभाल दुरुस्ती व नुतणीकरण कामे ठेकेदार कंपनीकडून करून घेण्याची जबाबदारी विजय बापट उप अभियंता (स्थापत्य) यांची होती. परंतु, त्यांनी दुरुस्तीचे कामे त्यांच्या मर्जीतील ठेकेदार कंपनीला देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतली. ही कामे शासनाच्या मापदंडप्रमाणे झालेली नसून अंदाज पत्रकातील तरतुदीना डावलण्यात आले आहे. त्यामुळेच या कामात गलथानपणा झाला असून काही महिन्यातच गळती सुरू झाल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रॅटीक )चे मुंबई प्रदेश सरचिटणीस विशाल नावकर यांनी माध्यमांना सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी मंगळवारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषदेत केली.


स्टुडिओच्या छतावर नवीन पत्रे बसवण्याची तरतूद अंदाज पत्रकात असतानाही छतावर पत्रे न बसवता छतावरचे जुने पत्रे काढून त्याच पत्रांना रंग देऊन छतावर बसवून काम पूर्ण झाले असे दाखवून सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते त्याच स्टुडिओचे २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी उद्घाटन करण्यात आले. या नवीन स्टुडिओत भर पावसात पाणी घुसल्यामुळे स्टुडिओचे काम निकृष्ट दर्जाचे झाले हे सिध्द होते. या गळतीमुळे येथील सामुग्रीचे नुकसान झाले आहे.

तसेच चित्रनगरीत हॉस्पिटल बिल्डींगच्या दुरुस्तीच्या कामाचे टेंडर महामंडळाकडून काढण्यात आले होते. या कामाची ई-निविदा प्रसिध्द झाल्यानंतर पात्र ठेकेदार कंपन्यांनी कामाचे टेंडर अंदाजपत्रकिय किंमतीच्या तरतुदीपेक्षा कमी दराने भरलेली असताना पात्र ठेकेदार कंपन्याना डावलुन विजय बापट उप अभियंता यांनी प्रिंटेरिअर कंपनीला हॉस्पिटल बिल्डिंगचे काम संगनमताने मिळवून दिले. यांची चौकशी होणे गरजेचे असलयाचे सांगत येत्या २ जुलै रोजी चित्रनगरीवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा परिषदेत देण्यात आला. यावेळी पक्षाचे नेते इम्रान मनसुरी, अवल शहा, भीमराव वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here