केतन खेडेकर (नागपूर प्रतिनिधी )
मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग हा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने त्यावर नेहमीच सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु या मार्गावरील वाकोला उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे ही वाहतूक कोंडी त्वरित सोडवावी यासाठी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभापतीकडे हिवाळी अधिवेशनात मागणी केली. या ठिकाणी खड्ड्यांमुळे, तसेच मेट्रोचे बांधकाम आणि उड्डाणपुलाची कामे इत्यादि कारणांमुळे या ठिकाणी वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असते. ज्यामुळे वाकोला उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी-लिंकपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. सागरी किनारा मार्गामुळे नरीमन पॉइंट ते वांद्रे हा प्रवास अतिशय जलद आणि आल्हाददायक झाला आहे. त्यामुळे नरीमन पॉइंट येथून अवघ्या २० मिनिटांत वाहने वांद्रे येथे पोहचतात. परंतु पुढे वांद्रे ते वाकोला उड्डाणपूल हे अंतर कापण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहनांना तब्बल एक तासाचा अवधी लागतो. यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. या वाहतूक कोंडीचा विपरीत परिणाम अत्यावश्यक सेवांवर होत असतो. अनेक रुग्णवाहिका चालकांना येथील वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. यास्तव पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाकोला उड्डाणपुलावरील खड्डेमय रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम शासनाने तातडीने हाती घेऊन या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांना आणि वाहनचालकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याची विनंती आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली.








