मुंबई प्रतिनिधी
स्नेहल क्रीडा मंडळ परळ आणि मद्य मुंबई मराठी विज्ञान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथील शिरोडकर विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांकरिता भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये विज्ञान, पर्यावरण, भूगोल या विषयांच्या अभ्यासक्रमात खडक, खनिजे, जीवाश्म याबद्दल वाचलेले असते. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. विद्यार्थ्यांनी हे नमुने पाहावेत, त्यांचे गुणधर्म अभ्यासावेत, मुलांमध्ये भौगोलिक विषयाची आवड व संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, या उद्देशाने शालेय व महाविद्यालयीन, विदयार्थ्यांकरिता “भूगर्भशास्त्र” या विषयावर आधारित एक आगळे वेगळे प्रदर्शन आयोजित केले गेले असल्याची माहिती डॉ अभिजीत पाटील यांनी दिली.
या प्रदर्शनात वैशिष्ट्यपूर्ण असे विविध शंभरहून अधिक खडक, खनिजे व त्यातील संरचना विद्यार्थ्यांना पाहता आली. उदाहरणार्थ गुरुस्फटी, महागुरुस्फटी, छिद्रयुक्त, कुहरी भरीत इत्यादी काळ्या पाषाणाचे विविध प्रकार तसेच तरंगवळ असणारा बालूकाश्म, पाण्यावर तरंगणारा प्यूमिस नावाचा खडक, रूपांतरणाची वलीय संरचना, खडक रूपांतरणाच्या विविध अवस्था, अनेक मूल्यवान धातू खनिजे, विविध उपरत्ने याशिवाय केसांसारखी तंतुमय रचना असणारे मेसो लाईट सारखे खनिज तसेच टाल्कम पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे टाल्क हे खनिज, लेन्समध्ये वापरले जाणारे काल्साइट, घड्याळात वापरले जाणारे क्वार्टझ सारखे खनिज, अभ्रक, टूर्मलिन, तसेच पायराइट, ग्रॅफाइट, झेब्रा अगेट, टायगर स्किन जस्पर, अमोनाइट बेलेमनाइट असे जीवाश्म अनेकविध नैसर्गिक आकर्षण या प्रदर्शनात प्रत्यक्ष पाहायला मिळाले व त्यांचा अभ्यास करण्याची संधी विद्यार्थी, शिक्षक व जनसामान्य लोकांना लाभली.या प्रदर्शनास जवळपास 10 शाळा आणि हजारो विद्यार्थ्यांनी आणि अनेक उत्सुकांनी उपस्थिती दर्शवली. सदर प्रदर्शनाची संकल्पना, संग्रह, संशोधन आणि सादरीकरण डॉ. योगिता पाटील (सहयोगी प्राध्यापक – गोपाळकृष्ण गोखले महाविदयालय, कोल्हापूर) व डॉ. अभिजित पाटील (सहाय्यक शिक्षक – विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर) यांनी केले.
सदर प्रदर्शनाच्या दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम शिरोडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती. पौर्णिमा माने मॅडम, क्षा.म.स. शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. भाऊ डगरे, श्री. बुडबे, श्री. रविन्द्र कुवेसकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहल क्रीडा मंडळातर्फे श्री. पंकज चव्हाण यांनी केले तसेच आभार प्रदर्शन स्नेहल क्रीडा मंडळातर्फे श्री. प्रदिप खताते यांनी केले. सुञसंचलन सौ. नमिता पंदेरे यांनी केले.
सदर प्रदर्शनाची संकल्पना
स्नेहल क्रीडा मंडळाचे संपर्क प्रमुख श्री. पंकज चव्हाण यांनी मांडली होती.








