मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला चे अध्वर्यू ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या पत्नी श्रीमती वैशाली विजय वैद्य यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लबने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर भारतीय लष्करात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या जवानांनाही सन्मानित करण्यात आले. जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील साई मंदिर सभागृहात भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात श्रीमती वैशाली विजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, तुळशीचेरोप असे पुरस्काराचे स्वरूप होते. वैशाली विजय वैद्य यांच्या बरोबरच एन एस जी कमांडो संताजी (सनी) अनंत शिगवण, प्रशांत चांदगुडे, अरविंद गव्हाणकर, ओंकार शिवाजी क्षीरसागर, संकल्प करिअर अकॅडमीचे ज्ञानेश्वर कराड, संदीप कराड, निर्भया पथकाच्या सौ. शुभदा साळसकर यांनाही सन्मानचिन्ह, शाल, तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी भारतीय लष्करी जवानांचा वेष परिधान करून शाळकरी मुली मुले यांचे जय महाराष्ट्र नगर परिसरात संचलन करण्यात आले. वैशाली विजय वैद्य यांनी इमारत क्रमांक अकरा जवळ संचलनाची मानवंदना स्वीकारली आणि भारताचा भला मोठा राष्ट्रध्वज उंचावून अभिवादन केले. वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख राकेश वायंगणकर, पल्लवी वायंगणकर, हर्षिता वायंगणकर यांच्या अधिपत्याखाली झालेल्या या कार्यक्रमास सनी शिगवण यांचे वडिल अनंत शिगवण, विजय घरटकर, जयवंत राऊत, माजी नगरसेवक गीता सिंघण, विजय सिंघण आदी मान्यवर उपस्थित होते. सैनिकी गणवेशातील विद्यार्थी विद्यार्थीनी यांना प्रशस्तीपत्रे देऊन त्यांनाही प्रोत्साहित करण्यात आले.*








