Home ब्रेकिंग बातम्या लोकशाहीला जाचक ठरणा-या जनसुरक्षा कायद्या विरुद्ध लढा उभारण्याचे गोविंदराव मोहिते

लोकशाहीला जाचक ठरणा-या जनसुरक्षा कायद्या विरुद्ध लढा उभारण्याचे गोविंदराव मोहिते

0


     मुंबई प्रतिनिधी : कामगारावरील अन्यायावर बोलण्यास मज्जाव करणाऱ्या आणि व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या राज्य सरकारच्या लोकशाही विरोधी जनसुरक्षा कायद्या विरूद्ध सर्वांना एकजुटीने लढावे लागेल,असे‌ आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी येथे आपल्या अमृतमहोत्सवपूर्ती समारंभात बोलताना केले आहे.
   राष्ट्रीय मिल मंजूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने आज मनोहर फाळके सभागृहात,महाराष्ट्र इंटक तसेच राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा अमृतमहोत्सवपूर्ती सोहळा संपन्न झाला.संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी कालच गोविंदराव मोहिते यांचे अभिष्टचिंतन केले.   
    आज पार पडलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजनभाई लाड होते.    
     रखडलेल्या गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर येत्या पावसाळी अधिवेशनात कामगारांचा भव्य मोर्चा काढून झोपलेल्या सरकारला जाग आणण्याचे काम केले जाईल,असे सांगून गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात पुढे म्हणाले,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(गृहनिर्माण) यांनी सह्याद्री येथे २५ एप्रिल रोजी कामगार संघटना आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मुंबईतील बंद गिरण्यांच्या  जमिनीसह इतर ठिकाणच्या उपलब्ध होणाऱ्या जागे संदर्भात माहिती जाणून तातडीने बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते,त्याला मोठाच कालावधी लोटला आहे, तरी अद्याप सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही,असे सांगून गोविंदराव मोहिते म्हणाले, संघाच्या वतीने मुंबईत उपलब्ध होणाऱ्या जागे संदर्भात सरकारला विस्तृत निवेदन देण्यात आले आहे. या प्रश्नावर संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवूनही सरकारने अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही,म्हणूनच सरकारच्या या वेळकाढू धोरणा विरुद्ध संघटना लढ्याचे पाऊल उचलणार आहे,असेही गोविंदराव मोहिते यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.त्या वेळी गोविंदराव मोहिते यांचा शाल,श्रीफळाने‌ सन्मान करण्यात आला.
   याप्रसंगी माजी नगरपाल‌ डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांनी गोविंदराव मोहिते यांच्या कामगार,सहकार,सामाजिक कार्याचा गुणगौरव करताना सांगितले,श्री.मोहिते‌ यांनी सज्जन आणि  प्रामाणिक कामातून आदर्श निर्माण केला आहे.
   या प्रसंगी संघटनेचे  ज्येष्ठ उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर यांचा ८० व्या वाढदिवसा निमित्त‌ कामगार चळवळीतील‌‌ निस्पृह आणि निष्ठापूर्वक कार्याबद्दल गुणगौरव करण्यात आला.
  ‌ संघटनेचे सहाय्यक सेक्रेटरी मोहन पोळ,सहकार संस्थेचे संचालक मारुती शिंत्रे,संघटन सेक्रेटरी नामदेव झेंडे,लेखपाल संतोष धनावडे यांचाही वाढदिवसा निमित्त सन्मान करण्यात आला.
   या प्रसंगी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस विजय धामणे,उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे,आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी‌.बी.गावडे, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष उत्तम गिते, मिलिंद तांबडे, संजय कदम, राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाचे संचालक विलास डांगे, जी.डी.आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजच्या प्राचार्या वैशाली हेगडमल,राष्ट्रीय मिल मजदूर वाचनालयाच्या ग्रंथपाल ममता घाडी, समाज सेवक विश्वनाथ कलवार‌, सुरेश मोरे,मनोज महाडीक आदींनी आपल्या भाषणात गोविंदराव मोहिते यांच्या बहुआयामी नेतृत्वाची माहिती दिली.
  अध्यक्षस्थानावरून बोलताना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड यांनी आपल्या  भाषणात सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या कामगार चळवळीतील कुशल कामाचा गुणगौरव केला.आभार महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष मा.नगरसेवक सुनिल अहिर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here