Home ब्रेकिंग बातम्या ज्येष्ठ प्रवचनकार अलका मुतालिक यांच्या हस्ते ‘ऋतुगंध’च्या चैत्रसंवाद विशेषांकाचे प्रकाशन

ज्येष्ठ प्रवचनकार अलका मुतालिक यांच्या हस्ते ‘ऋतुगंध’च्या चैत्रसंवाद विशेषांकाचे प्रकाशन

0




डोंबिवली प्रतिनिधी : मराठी भाषा, मुद्रित साहित्य आणि संस्कृती संवर्धनाचा वारसा जपणाऱ्या ऋतुगंध या नियतकालिकाच्या ‘चैत्रसंवाद’ विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी, २० मार्च रोजी डोंबिवली पूर्व येथील श्री गणेश मंदिरात करण्यात आले. गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रवचनकार अलका मुतालिक यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार मनोज मेहता यांची उपस्थिती होती.

प्रकाशन सोहळ्याच्या सुरुवातीला ऋतुगंधची प्रत टिळकनगर विद्यामंदिरची विद्यार्थिनी आणि या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकलेली स्मिहा पाटोळे हिच्या हस्ते गणरायाच्या चरणी अर्पण करण्यात आली. अभ्यासू लेख, चिंतनशील विचार आणि लालित्यपूर्ण मांडणीने नटलेला हा अंक यंदा वाचकांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.

ऋतुगंध परिवारातर्फे दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवल्या जातात. गेल्या वर्षी शाळकरी मुलांच्या हस्ते प्रकाशन करून बालशक्तीचा गौरव करण्यात आला होता. यावर्षी शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत हा अंक थेट पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. शाळकरी विद्यार्थीनी स्मिहा पाटोळे विविध मान्यवरांना भेटून हा विशेषांक भेट देत आहे. आतापर्यंत कल्याण-डोंबिवलीच्या महापौर हर्षाली चौधरी-थविल, प्रसिद्ध लेखक व कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चाधिकारी माधव जोशी, तसेच विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक आणि मान्यवरांना हा अंक सन्मानपूर्वक भेट देण्यात आला आहे.

गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होणारा ऋतुगंधचा हा विशेषांक मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करून आहे. अनेक नामवंत लेखकांच्या लेखणीतून उतरलेले विचारमंथन हे या अंकाचे मुख्य आकर्षण असते. यंदाचा अंकही वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास संपादकीय मंडळाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here