मुंबई प्रतिनिधी :
मुलुंड, भारतीय जनता पार्टीच्या मुंबई महिला मोर्चा अध्यक्षपदी योजना ठोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. या नियुक्तीबद्दल ठोकळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना योजना ठोकळे यांनी सांगितले की, “हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे.
मी बौद्ध समाजातील, सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी असून सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना आंबेडकरी चळवळीशी नाळ जोडलेली असून अनेक सामाजिक,शैक्षणिक योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.” संविधान जागर यात्रा संयोजिका म्हणुन महाराष्ट्र भर संविधानाची जनजागृती केली. २०२५ ला त्यांना महाराष्ट्र शासनाचा
डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
त्या पुढे म्हणाल्या की, “मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात एका राष्ट्रीय पक्षाच्या सामान्य कार्यकर्तीपासून महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्षपदापर्यंत पोहोचणे ही मोठी जबाबदारी आहे. पक्षनिष्ठा, संयम आणि संघटन कौशल्य असेल तर पक्ष नक्कीच कार्यकर्त्यांना न्याय देतो, याचा हा पुरावा आहे.”
योजना ठोकळे यांनी सांगितले की, पक्षाने दिलेल्या या पदाचा उपयोग करून त्या महिला मोर्चाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करणार आहेत. शहरातील अधिकाधिक महिलांना पक्षाशी जोडणे, त्यांचे प्रश्न ऐकून त्यावर काम करणे आणि महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे यासाठी त्या विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“तुमचा विश्वास ही माझी ताकद आहे आणि पक्षाचे संस्कार हा माझा मार्ग आहे. शब्दांपेक्षा कृतीतून काम करून दाखवणे हेच माझे ध्येय असेल,” असेही त्यांनी यांनी सांगितले.








