विशेष प्रतिनिधी | मुंबई :
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड ठरली असून Indian Society of Vascular and Interventional Radiology (ISVIR) च्या महाराष्ट्र शाखेची २०२५–२६ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेश मुंडादा (नागपूर) यांच्या देखरेखीखाली बिनविरोध व एकमताने पार पडली. या बिनविरोध निवडीतून महाराष्ट्रातील इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी क्षेत्रातील डॉक्टरांमधील व्यावसायिक सलोखा, संघटनात्मक एकजूट आणि सामूहिक दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे.
या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी डॉ. अविनाश गुट्टे यांची निवड करण्यात आली आहे. ते Grant Medical College & JJ Hospital, मुंबई येथे प्राध्यापक व इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सचिवपदाची धुरा डॉ. शिवाजी पोळे यांच्याकडे सोपवण्यात आली असून ते MGM Hospital, छत्रपती संभाजीनगर येथे विभागप्रमुख आहेत.
उपाध्यक्षपदी डॉ. विवेक उकिरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते LT Medical College & Sion Hospital, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आगामी कार्यकाळातील अध्यक्ष (President-Elect) म्हणून डॉ. यादव मुंडे यांची निवड करण्यात आली असून ते Ruby Hall Clinic, पुणे येथे इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी विभागप्रमुख आहेत.
कोषाध्यक्षपदी डॉ. तेजस सदावर्ते (जीएमसी, नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सह-सचिव म्हणून डॉ. पृथ्वीराज जाधव आणि डॉ. स्वेनिल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच मुंबई, नागपूर, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील अनुभवी व नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे भौगोलिक व वैद्यकीय प्रतिनिधित्व या नूतन कार्यकारिणीत साध्य झाले आहे.
१९९७ साली अवघ्या २८ सदस्यांपासून सुरू झालेल्या ISVIR संस्थेने आज १,२०० हून अधिक राष्ट्रीय सदस्यसंख्या गाठली आहे. इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी ही ‘पिनहोल’ तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक उपचारपद्धती असून, मेंदूतील स्ट्रोक, रक्तवाहिन्यांचे आजार, व्हेरिकोज व्हेन्स तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर विना-शस्त्रक्रिया, कमी वेदनादायक आणि कमी कालावधीतील उपचार देणे शक्य झाले आहे. रुग्णालयात कमी दिवस राहणे, जलद बरे होणे आणि उपचार खर्चात बचत होणे, हे या पद्धतीचे मोठे फायदे आहेत.
नूतन कार्यकारिणीने पुढील कार्यकाळात प्रशिक्षण, संशोधन आणि उपचारांचा विस्तार या तीन प्रमुख उद्दिष्टांवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका पातळीपर्यंत इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी सेवा पोहोचवणे, तरुण डॉक्टरांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणे आणि सर्वसामान्य रुग्णांना या जीवनरक्षक उपचारांचा लाभ मिळवून देणे, हा या कार्यकारिणीचा मुख्य अजेंडा असणार आहे.
आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धती यासाठी ISVIR महाराष्ट्रची नूतन कार्यकारिणी आगामी काळात निर्णायक भूमिका बजावेल, अशी अपेक्षा वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.
—
Home ब्रेकिंग बातम्या ISVIR महाराष्ट्रची नूतन कार्यकारिणी जाहीरविना-शस्त्रक्रिया उपचार क्रांतीचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्धार








